धुळे । धुळे तालुक्यासह जिल्हयात वादळ वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाली. बेमोसमी पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करुन अहवाल शासनास सादर करावा, आणि शेतकर्यांना सरससकट 100 टक्के नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांच्याकडे केली आहे. दरम्यान या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी आमदार राम भदाणे यांनी केली असून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली.
बेमोसमी पावसामुळे धुळे तालुक्यतील शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गारपीठ आणि सोसाट्याच्या वार्यामुळे गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, दादर, मका, भूईमुग, पपई, शेवगा, लिंबू,डाळींब, केळी, टरबूज यांच्यासह फळबागायत व भाजीपाल्याचे प्रंचड नुकसान झाले आहे. गारपीटमुळे कांद्याची पात व कांदा भूईसपाट झाला आहे. शेतात असलेल्या कांद्यात पाणी शिरल्याने कांदा सडण्याची भिती निर्माण झाली आहे. गहू, ज्वारी, मका, बाजरी, दादर वादळामुळे जमीनदोस्त झाले असून गारपीटीमुळे हातात आलेली ही पिके मातीत मिसळली आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.
सोसाट्याचा वार्यामुळे पपई, शेवगा, डाळींब, लिंबू , केळी या फळबागातील झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने त्यावरील फळांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याचेही गारपीठीमुळे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वार्यामुळे कांदाचाळी तसेच घरावरील पत्रे उडाल्याने मालमत्तेचीही नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे तातडीने पंचनामा करुन अहवाल शासनास सादर करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट 100 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
Discussion about this post