जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. देवांश दिनेश महाजन असं मयत मुलाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, चाळीसगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा नॅक्सॉन (क्रमांक एम.एच.५२/बी ०९९६) या चारचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या फॉर्च्यूनर (क्रमांक एम.एच. १८/बीएक्स ००११) वाहनाने भोरस गावाजवळ जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नॅक्सॉन वाहनचालक दिनेश देवराम महाजन यांचा चार वर्षांचा मुलगा देवांशचा जागीच मृत्यू झाला, तर दिनेश महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि १२ वर्षीय मुलगी आरोही महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील फॉर्च्यूनर वाहन हे डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांच्या मालकीची असून, ते स्वतः हे वाहन चालवत होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक निरीक्षक संदीप घुले आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. डॉ. मंदार करंबेळकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, डॉ. उत्तमराव महाजन यांच्या विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post