मुंबई । शाळेची भरमसाठ फी, शैक्षणिक साहित्य आणि इतर खर्च यामुळे पालकांचा खिसा आधीच रिकामा होत आहे. त्यात आता स्कूल बेचे भाडे वाढणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेने जाहीर केले आहे. एप्रिल महिन्यापासून स्कूल बसचे शुल्क 10 ते 12 टक्के वाढणार आहे.
सरकारने सांगितले की, ते मुंबई महानगर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी नवीन स्कूल बस सुरक्षा नियम तयार करण्यास उत्सुक आहेत. ज्यासाठी अलिकडेच स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीने शिफारसी केल्या आहेत.
याबाबत एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले की, “आमच्या ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने विविध कारणांमुळे बस शुल्क वाढवणे आवश्यक आहे. 2011 चे स्कूल बस धोरण आणि सुरक्षा समिती धोरण, सर्वोच्च न्यायालयाच्या स्कूल बसेसवरील मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त नवीन नियमांची आवश्यकता नाही,” असंही ते म्हणाले.” एप्रिल महिन्यापासून होणाऱ्या शुल्कवाढीबाबत गर्ग यांनी म्हटलं की, “आम्ही स्कूल बस ऑपरेटर्स आणि इतर भागधारकांची बैठक घेतली आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढीचा निर्णय घेतला. हे नवीन बस खरेदी करण्यासाठी वाढत्या भांडवली खर्चामुळे, या बसेसच्या देखभालीचा मोठा खर्च, कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, बसेसमध्ये सक्तीची जीपीएस प्रणाली आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे यामुळे झाले आहे.”
गर्ग यांनी सरकारच्या एक सदस्यीय पॅनेलला आणि नवीन नियम तयार करण्यासही विरोध केला. या संदर्भात त्यांनी गुरुवारी वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार यांची भेट घेतली.
Discussion about this post