विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरूच असून अशातच एकाच दिवसात ठाकरेंना दोन मोठे धक्के बसणार आहे. कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे. कोकणात ठाकरे गटातील नेत्या स्नेहल जगताप यांचा आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीत ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे.
सांगलीतील ठाकरे शिवसेना गटातील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी हे शिवसेना शिंदे गटात आज पक्ष प्रवेश करणार आहेत. सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे. सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, युवा सेना प्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुख, सरपंच आणि ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या सरकारी मुक्तागिरी या बंगल्यावर आज सायंकाळी पाच वाजता पक्षप्रवेशाचा हा सोहळा होत आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षात योग्य तो सन्मान मिळत नाही आणि पक्ष वाढीसाठी वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने पक्ष सोडत असल्याचे संजय विभूते यांची माध्यमांना सांगितले.
सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा उकरुन काढल्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कोंडीत सापडले आहेत. तर दुसरीकडे अनेक कट्टर शिवसैनिक त्यांची साथ सोडत असल्याचे दिसते. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Discussion about this post