धुळे : धुळे तालुक्यातील बल्हाने ते मोरशेवडी रस्त्यावर लोकांना अडवून लुटमारी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. ज्ञानेश्वर ईश्वर भिल [वाघ] रा.मोरशेवडी), असे या संशयिताचे नाव आहे. धुळे पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याकडून १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धुळ्याच्या मौलवी गंज परिसरात राहणारे अभिजान मुन्ना खान यांचा मिक्सर मशीन विक्री करण्याचा व्यवसाय आहे. याच कामासाठी ते दुचाकीवरून बल्हाने ते मोरशेवडी रस्त्यावरून निघाले होते. येथील बंद पडलेल्या कारखान्याजवळ एका अनोळखी व्यक्तीने त्यांची दुचाकी अडवली. यानंतर चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील रोकड आणि अन्य ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर खान यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी पथकाला चोरट्याचा शोध घेण्याची सूचना दिली. त्यानुसार पथकामार्फत शोध सुरू असता ज्ञानेश्वर भिल हा लुटमारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून १४, ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक दिपक धनवटे, खालेदा सैय्यद, कुणाल पानपाटील, उमेश पवार, अविनाश गहिवड, विशाल पाटील यांनी केली.
Discussion about this post