धुळे : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचत कारमधून विदेशी दारू आणि बिअरचा साठा जप्त केला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.
राज्यात दारू विक्री व वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असताना देखील मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून छुप्या पद्धतीने विदेशी तसेच बनावट दारुची तस्करी केली जात असते. पोलिसांनी अनेकदा कारवाई करत दारूचा साठा जप्त केला आहे. तरी देखील छुप्या पद्धतीने दारूची तस्करी करण्यात येत असल्याचे धुळ्यात झालेल्या कारवाईवरून समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव- धुळे महामार्गावर लक्झील होम डेकॉर शॉपजवळ सापळा रचला. यावेळी पोलिसांना संशयास्पद कार दिसताच त्यांनी तिचा पाठलाग करून थांबवले. कारची झडती घेतली असता मागील सीटवर आणि डिक्कीत असलेल्या मोठ्या बॉक्ससारख्या कप्प्यात विविध कंपन्यांची विदेशी दारू आणि बिअर सापडली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारमधून १ लाख ३३ हजार ३२५ रुपये किमतीची विदेशी दारू आणि बिअर तसेच ५ लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. तर विदेशी दारू आणि बिअरची तस्करी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post