नागपूर | औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्य तापलंय असून यातच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. अशातच नागपूरमध्ये १७ मार्चच्या रात्री २ गटात तुफान राडा झालाय. यानंतर आज कलम १६३ अंतर्गत अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील, असे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी सांगितले.
नेमका कसा घडला हिंसाचार?
बाजूच्या मुस्लिम वस्त्यांमधील जमाव महालच्या शिवाजी चौकात आला. या जमावाने घोषणाबाजी करताच, दोन्ही गट एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले. दोन्हींकडून परस्परांवर दगडफेक करून गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. तणाव निवळण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्यामुळे तणावात भर पडली. यात दोन पोलिस आणि काही नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दगडफेकीसोबत जाळपोळही
उपलब्ध माहितीनुसार, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकात पोहोचला. या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदेने दुपारी केलेल्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसर्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणार्या दोन्ही गटांना चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले. यानंतर दोन्ही गटांत तुफान राडा झाला आणि दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. दगडफेकीसोबत जाळपोळही करण्यात आली.
पोलिसांवर जमावाची दगडफेक
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर जमावाकडून पोलिसांच्या दिशेनेही दगड भिरकावण्यात आले. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी आणि काही नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी दंगा काबू पथकाला पाचारण केले आहे.
Discussion about this post