धुळे : सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणविण्यात सुरुवात झाली असून यानंतर आता ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांवर भटकण्याची वेळ आली आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यातील धंगाई गावात महिलांना पाण्यासाठी उन्हातानात लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे. महिलांना पाण्यासाठी गावाबाहेर असलेल्या विहरीवर पायपीट करावी लागत आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पाणी टंचाईचे भीषण चित्र पाहण्यास मिळत आहे. दापूर गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या धंगाई गावाबाहेर दोन ते तीन किलोमीटर विहीरीत बादलीने पाणी काढून आणावे लागत आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी ग्रामसेवक धंगाई गावापर्यंत येत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
साक्री तालुक्यातील धंगाई हे गाव दापूर या ग्रुप ग्रामपंचायतीत असणारे गांव आहे. येथे कोकणी, भिल्ल समाज वस्ती असून सर्व मजूरीवर अवलंबून आहेत. मजुरीसाठी सकाळी त्यांना घराबाहेर पडावे लागते. म्हणून पाण्यासाठी पहाटे उठून जावे लागत असते. येथे नव्याने पाणी पुरवठा योजना मंजूर असून पाण्याची टाकी आहे. पण या टाकीत अद्याप पाणी पोहचलेच नाही. तिची टेस्टीगही घेण्यात आली नाही. येथे जुनी टाकी आहे, पण पाण्याचा नियोजन अभावी एकाच गल्लीत पाणी जाते; तर निम्मी गावकऱ्यांना पाणी पोहचतच नाही.
आता मार्च महिना सुरू होवुन पंधरा दिवस झाले असून एप्रिल, में व जूनपर्यंत पाणी कसे मिळेल? यासाठी येथील नागरीकांनी साक्री पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेण्याचा इशारा येथील महिला, पुरुषांनी दिला आहे.
Discussion about this post