जळगाव । काही दिवसापूर्वी बंड करत अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात आगमन झाल्यानंतर ना. अनिलदादा पाटील यांचे जबरदस्त जल्लोषात स्वागत करण्यात आले.
ना. अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील बैठकांसह अन्य महत्वाची कामे असल्याने ते मुंबईतच होते. यानंतर आज म्हणजेच ७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते वाराणसी महानगरी एक्सप्रेसने ते सकाळी सातच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले.
ना. अनिल पाटील हे ट्रेनमधून उतरल्यानंतर फलाटावर त्यांना मानाचा फेटा बांधण्यात आला. यानंतर पुष्पवर्षावरत त्यांचे स्वागत करण्यात आले. तर अनेक जणांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. फलाटावरून रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी जयघोषाने परिसर दुमदुमला होता. फलाटावरून बाहेर आल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले. यानंतर ते पायी चालत समर्थकांसह पुढे आले. याप्रसंगी दोन जेसीबींमधून त्यांच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले.
Discussion about this post