पुण्यामध्ये काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर पुण्यातील काँग्रेसमध्ये आऊट गोईंग सुरू झाले आहे. पुण्यात काँग्रेसला खिंडार पडताना दिसत आहे. पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी राजीनामा देणार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये हा काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य १०० पदाधिकारी येत्या दोन ते तीन दिवसांत राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे काही पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची भेट घेतल्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
पुण्यात काही दिवसांपूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर ते नाराज असून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. शेवटी त्यांनी निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पुण्यात काँग्रेसला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Discussion about this post