रावेर : रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या मुसळधार पावसाने रावेर शहरातील माजी नगरसेवकासह दोघे जण वाहून गेल्याची माहिती समोर आलीय. तर मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली, रात्रीपासुन नातेवाईक त्यांचा शोध घेत आहे.तर प्रशासन सुद्धा सकाळपासुन मदतकार्यात लागले आहे.
रावेर तालुक्यात व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने सुकी धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो झाले आहे. रात्री अभोडा येथील तसेच शहरातून गेलेल्या नागझिरी नदीला मोठा पूर आला आहे. रात्री दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपूर येथील नदीला पूर आला आहे. अभोडा येथील नदीच्या पुरात बाबुराव रायसिंग बारेला हा वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर रावेर शहरातील माजी नगरसेवक यांच्यासह एक जण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे दोघे बेपत्ता झाले असून त्यांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते ती दुचाकी आढळली असून, दोघांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. तर रसलपुर मध्ये बलेनो कार वाहून गेली असून, प्रवाशांनी गाडीतून उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत.
रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. यासोबत रमजीपुर रसलपुर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुर मध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहे. खिरोदा व रावेर येथील दहा ते बारा गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
Discussion about this post