मुंबई । संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात रान पेटलेलं असून अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी बीडमधील सध्याची परिस्थिती आणि तेथील वाढत्या गुन्हेगारीवरून तेथील राजकारण्यांवर निशाणा साधलाय. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे तेथील परिस्थिती तशी झालीय. आधी बीड असा जिल्हा नव्हता, असं म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. तसेच राज्यातील धार्मिक तेढ आणि मल्हार झटका मटणावरून सुरू असलेल्या वादंगाबद्दलही ते थेट बोलले.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो. पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती. शांत, समन्वयाने सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा बीड जिल्ह्याचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी स्वत: जेव्हा त्या भागात लक्ष देत होतो, तेव्हा तिथे सहा-सहा सदस्य निवडून आले होते, तिथे एक प्रकारे सामंजस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला गेले काही महिने बीडमध्ये दिसत आहेत. माझं स्पष्ट मत आहे की राज्य सरकारने यात कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशांच्या संबंधी अत्यंत सक्त धोरण आखण्याची गरज आहे. आणि बीडला पूर्वीचे वैबवाचे दिवस कसे येतील याची काळजी घ्यावी असे शरद पवार म्हणाले.
हे सरसकट राज्यातील वातावरण असं आहे असं मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती काही बिघडली आहे. पण गैरफायदा घेणारे काही घटक आहे. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. सख्त कारवाई करावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केलं.
Discussion about this post