जळगाव : जळगावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ज्यात मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परत जाणाऱ्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन थेट खाली कोसळला. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १० मार्चला रात्री नऊच्या सुमारास घडली. जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर येथील अनिल जाधव (वय ३९) असे मृताचे नाव आहे. अनिल जाधव हे रावेरमध्ये कुटुंबीयांसोबत वास्तव्याला होते. दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला आले होते. पत्नी व मुलगा जळगावीच होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर अनिल जाधव हे १० मार्चला घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री नऊला ते जळगाव रेल्वेस्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले.
धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरला
अनिल प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्लॅटफॉर्म तीनवर आलेल्या कामायनी एक्स्प्रेस धकली. यामुळे अनिल हे धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान त्यांचा पाय सटकून तोल गेल्याने ते फलाट आणि रेल्वेतील पोकळीत सापडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचा घटनास्थळावर पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
नातेवाईकांचा आक्रोश
दरम्यान पोलिसांनी कागदपत्रावरून मृताची ओळख पटवून कुटुंबीयांना कळविण्यात आले. यानंतर त्यांचे नातेवाईक दाखल झाले. मृत्यूची माहिती कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
Discussion about this post