मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. या रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यात भाजपच्या वाट्याला तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी मतदान होणार आहे. या जागांवर कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता लागलेली आहे. मात्र या निवडणुकीआधी अजित पवारांची डोकेदुखी वाढली असून राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले आहेत.
१०० जणांचे विनंती अर्ज
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १०० जणांनी विनंती अर्ज केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दोन विधान परिषदेच्या जागा आहेत. त्यापैकी एक जागा राज्यपाल नियुक्त कोट्यातून पक्षाला मिळणार आहे. तर दुसरी जागा विधान परिषदेमध्ये आमदारांमधून निवडून जाणारी जागा आहे. त्यासाठी देखील इच्छुकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या आमदारांच्या जागेसाठी होणार मतदान
विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेत आमदार होते. विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त आहेत. विधानसभेवर निवड झाल्यानंतर पाच आमदारांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्यात, या पाच जागांसाठी आता २७ मार्चला निवडणूक होणार आहे.
Discussion about this post