जळगाव । जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जळगाव तालुक्यातील कुसुंबा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त केली असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार नितीन ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुसुंबा परिसरात तुषार अशोक सोनवणे नावाचा इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीची खात्री करून तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविण्यात आले. यासंदर्भात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि चंद्रकांत धनके, पोलीस अंमलदार छगन तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांना आवश्यक कारवाईसाठी रवाना करण्यात आले.
पोलिसांनी कुसुंबा हॉटेल पुष्पा परिसरात गस्त घालत असताना संशयित तुषार सोनवणे हा हळदी रंगाचा शर्ट घालून मोपेडवर बसलेला दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलीस पथकाने सतर्कता दाखवत त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संशयिताची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेत २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि २ हजार रुपये किंमतीच्या दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे असलेली ५० हजार रुपये किंमतीची होंडा शाईन दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी एकूण ७२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोउपनि चंद्रकांत धनके व पोलीस अंमलदार योगेश बारी करत आहेत.
Discussion about this post