जळगाव : जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात गेल्या चार वर्षांपासून एका खून प्रकरणात कारागृहात असलेल्या आरोपीची शुक्रवारी (दि.२१) जामीनावर सुटका झाली. तो कारागृहातून आल्यानंतर तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. प्रतीक हरिदास निंबाळकर (वय २९, रा. जुने कानडदा रोड सिटी कॉलनी जळगाव) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सन २०२० मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात प्रतीक गेल्या चार वर्षांपासून कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. दरम्यान, न्यायालयाच्या अटी-शर्तीवर त्याला आज (शुक्रवारी) जामीन मंजूर करण्यात आला. सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता प्रतीक निंबाळकर हा त्याचा भाऊ वैभव निंबाळकर यांच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान शाहूनगर येथील धरम हॉटेलजवळून जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर डीवायएसपी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली.
Discussion about this post