मुंबई : बंडखोरीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा वांद्रे येथील एमईटी मैदानावर मेळावा पार पडला. यावेळी पहिल्यांदाच अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली. अजित पवार यांनी नुसती शरद पवार यांच्यावर टीकाच केली नाही तर शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोलही केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याचं जाहीर आवाहनही केलं आहे.
नोकरीनंतर माणूस 58 व्या वर्षी निवृत्त होतो. आयएएस असेल तर 60 व्या वर्षी निवृत्त होतो. भाजपने तर राजकारणातील निवृत्तीचं वय 75 केलं आहे. आमच्या हातात पक्ष द्या. निवृत्त व्हा. आराम करा. आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही सांगा ना. चुकलं तर चुकलं सांगा ना. आम्ही चूक दुरूस्त करून पुढे जाऊ. का हे केलं जातं? कशासाठी केलं जातं?आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला. तसेच तुम्ही राजीनामा दिला होता तर मागे घेतलाच कशाला? असा सवालही अजितदादांनी शरद पवार यांना केला.
मला सांगितलं राजीनामा देतो आणि संस्थेची कामे पाहतो. राजीनामा दिल्यावर एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही बसा. आणि बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो. तेही आम्हाला मान्य होतं. त्यानंतर दोन दिवसात सांगितलं राजीनामा मागे घेतला. मागे घेतला तर दिला कशाला? मी सुप्रियाला सांगितलं त्यांना सांग. ते हट्टी आहेत. पण असा कुठला हट्ट आहे. आमदारांना फोन केला जात आहे. ते भेटले नाही तर त्याच्या पत्नीला फोन करून भावनिक केलं जातं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
Discussion about this post