मयूरभंज । ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला विकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिलेने अवघ्या 800 रुपयांना आपली मुलगी विकली. करामी मुर्मू असं आईचे नाव असून या प्रकरणात मुलीची आई, तिला विकत घेणारे जोडपे आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
करामी मुर्मू हिला एकूण दोन मुली आहेत. तिने आपल्या नऊ महिन्यांच्या लिसा नावाच्या मुलीला विकलं. तिच्या पतीचे नाव मुशू मुर्मू आहे. करामीच्या या कृत्याबद्दल पतीला माहिती नव्हती. मुशू तामिळनाडूमध्ये काम करतो. गावात एकटीच राहून पत्नी दोन्ही मुलींचा सांभाळ करत होती.
बऱ्याच दिवसांनी नवरा ओडिशातील त्याच्या घरी परतला तेव्हा त्याला एकच मुलगी दिसली. पत्नीने योग्य उत्तर दिले नाही. त्यानंतर स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आईच्याच या कारनाम्याची पोलिसांना माहिती मिळाली.
मीडियाशी संवाद साधताना आई करामीने सांगितले की, तिला घरखर्च चालवण्यात खूप अडचणी येत होत्या. ज्या कुटुंबाला मुलगी दिली होती त्यांना मूल नव्हते. बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली मुलीला तिच्या आजीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. वडील तामिळनाडूत नोकरीवर परतले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Discussion about this post