मुंबई । गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत असून अशातच आता कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला
राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत आणि राजन साळवी उपस्थित होते. “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं राजन साळवी यांनी या बैठकीनंतर म्हटलो होते.
तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट सोडण्याचे कारणही सांगितले होते. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यानंतर वाटलं आता थांबाव, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असं आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ’ असे राजन साळवींनी म्हटले.
Discussion about this post