जळगाव/मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतल्याने जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रिपद मिळाले आहे. मात्र अजित पवार, अनिल पाटील यांना कोणती खाती मिळणार हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीय. यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याकडे राज्याच लक्ष लागलं आहे.
यातच अजित पवार यांच्यासह आठ आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे. त्यानुसार अनिल पाटील यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पद मिळण्याची संभावना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. छगन भुजबळ ओबीसी कल्याण, दिलीप वळसे पाटील संसदीय कार्य आणि कृषी मंत्रालय, हसन मुश्रीफ औकाफ आणि कामगार कल्याण मंत्रालय, आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास खातं, धनंजय मुंडे यांना समाज कल्याण मंत्रालय, संजय बनसोड क्रीडा आणि युवक कल्याण, अनिल पाटील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तर धर्माराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबादारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाकडे असलेली खाती काही मंत्री सोडायला तयार नाहीत. तर राष्ट्रवादीचे मंत्री सीनियर असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा तीनही पक्षात चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पदावरुनही तिढा निर्माण झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
Discussion about this post