नंदूरबार । नंदूरबारमधील शहादा भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक लाच घेताना जाळ्यात अडकला आहे. उपअधीक्षक अभिजीत वळवी यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील ५ हजारांची लाच घेताना लाचखोर उपअधीक्षकाला रंगेहाथ पकडलं आहे.
शेत मोजणीच्या शीटसाठी ७४ वर्षीय शेतकऱ्याकडून लाच मागितली असल्याचं समोर आलं आहे. ७४ वर्षीय शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली आहे. तर उपअधीक्षक अभिजीत वळवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरीकडे सोलापुरमध्ये देखील असाच लाच मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे. वेतन श्रेणीच्या फाईलवर शिक्षणाधिकाऱ्यांची सही घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात हा लिपिक अडकला आहे. घनश्याम अंकुश मस्के असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
तक्रारदार शिक्षकाची सेवा २४ वर्षे पूर्ण झाली तरी निवड श्रेणीचा प्रस्ताव मान्यतेसाठी २५ ऑक्टोबर २०२३ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर केला होता. तक्रारदार शिक्षक वारंवार पाठपुरावा करत होता. निवड श्रेणी मान्यतेसाठी आरोपीने सुरुवातील पाच हजार स्विकारले. ३० हजार दिल्यानंतर मान्यतेसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले होते. तडजोडीअंती ३२ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने तक्रार नोंदवली. विभागाच्या पथकाने सापळा लावल्यावर पहिला हप्त्यापोटी २० हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. मस्के याच्यावर सदर बाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Discussion about this post