मुंबई । पर्वतीय भागांतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भागात गारवा टिकून आहे. तर त्याचवेळी, दक्षिण भारतात किनारपट्टी भागांवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामानात बदल होताना दिसत आहेत. दरम्यान, सध्या राज्यातील अनेक ठिकाणी थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.
यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात येत्या दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. पूर्वेकडून मुंबईकडे वाहणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे शुक्रवार ते रविवार दरम्यान शहराचे तापमान ३५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मुंबईत सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील बांधकामे आणि काँक्रिटीकरणामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्याची आवश्यकता आहे. विशेषतः दुपारी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये तापमान वाढीचा इशारा दिला आहे.
थंडी कमी होऊन तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. दुपारच्या वेळेस वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता जाणवेल, विशेषतः मैदानी भागात काम करणाऱ्यांसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना कराव्यात, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Discussion about this post