मुंबई। मागील काही काळापासून उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसताना दिसत असून यातच आता उद्धव ठाकरेंना मोठा हादरा देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या साथीला येणार आहेत, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अडीच वर्षांनी पुन्हा एकदा पक्षात राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाण्याची चर्चा होती. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही आठवड्यांपूर्वीच ठाकरेंना पुन्हा हादरा बसण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार लवकरच लोकसभेतील ठाकरेंच्या सहा शिलेदारांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हावर नऊ जण लोकसभेत निवडून आले होते, त्यापैकी दोन तृतीयांश म्हणजेच सहा खासदार शिंदेंकडे येण्याची चिन्हं आहेत. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गता कारवाई टाळण्यासाठी किमान सहा जणांनी पक्ष सोडणे आवश्यक आहे, तरच त्यांची खासदारकी टिकून राहील.
दरम्यान, हे खासदार नेमके कोण, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्यासोबत काही माजी आमदार, नेते असण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी किंवा त्या काळात हे पक्षांतर होण्याची चर्चा आहे. आता उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार किंवा पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Discussion about this post