जळगाव । अमेरिका आणि चीन या आर्थिक महासत्तांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदारांनी सोने खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. परिणामी, गेल्या चोवीस तासांत 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ८७ हजार रुपयांवर गेला आहे. तर, चांदीचा प्रतिकिलो भाव पुण्यात ९७ हजार रुपये असून, देशात विविध ठिकाणी चांदीचा दर 99,500 रुपयांवर गेला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय जाहीर केला, नंतर चीनवर प्रत्यक्ष करवाढ लागू केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात कमालीची अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी, गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेसाठी सोन्यात पैसे ओतण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, चोवीस तासांत सोने १५०० रुपयांनी महागले आहे.
यामुळे जळगावच्या सुवर्णपेठेत वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) शुद्ध सोन्याचा दहा ग्रॅमचा दर प्रथमच 87 हजार रुपयांवर गेला आहे. तर, जीएसटी वगळून शुद्ध सोन्याचा दर ८५,१०० रुपये आहे. तर, दहा ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७८ हजार रुपये असून, जीएसटीसह दर ८०,३४० रुपये आहे.
सोन्याचे भाव जास्त असल्याने शुद्ध सोने खरेदीसाठी नागरिक काही प्रमाणात हात आखडता घेत आहेत. मात्र, २२ कॅरेट सोन्याला चांगली मागणी आहे. लग्नसराई असल्याने नागरिक खरेदी करत आहेत. जास्त भावामुळे जुने सोने देऊन नवे सोने खरेदी करणार्यांची संख्याही वाढली आहे. वाहतूक आणि साठवणूक खर्च वेगवेगळा असल्याने देशात विविध ठिकाणी सोने आणि चांदीच्या दरात एक ते दोन हजार रुपयांची तफावत असू शकते.
Discussion about this post