जळगाव । राजकारणातील एकमेकांचे कट्टर शत्रू अशी ओळख राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची काल रात्री सागर बंगल्यावर भेट झाली. मात्र या भेटीनंतर खडसेंच्या भाजपमधील संभाव्य घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे. यातच एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया देत भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले खडसे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर एकनाथ खडसे मंगळवारी रात्री दाखल झाले. यावेळी इतर नेतेही उपस्थित होते. या भेटीबद्दल खडसेंनी प्रतिक्रिया दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो होतो. माझ्या मतदारसंघात सहकारी तत्त्वावरील सूतगिरणी आहे, त्याच्या भाग भांडवलाचा विषय होता.
मुक्ताबाई मंदिर, अल्पसंख्याकांचे इंजिनिअरिंग कॉलेज लांबले आहे. त्या निवेदनांवर त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला, असे खडसे म्हणाले. ही पूर्वनियोजित भेट होती. त्यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार एक तास भेटलो, मात्र यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विकासकामांच्या पलिकडे कोणतेही विषय झाले नाही. सध्या भाजप प्रवेशाचा कोणताही विचार नाही, त्या अफवा आहेत, चर्चा निरर्थक आहेत, असे खडसेंनी स्पष्ट केले.
Discussion about this post