मुंबई : फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हवामानात चढउतार दिसत आहे.गेल्या आठवड्यापासून थंडी कमी झाली असून पहाटे हलका गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आता फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे.
हवामान विभागाचे महासंचालक, डॉ मृत्यूंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात किमान व कमाल तापमान आता चढे राहणार असून मुंबईसह किनारपट्टी भागात तसेच मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्या प्रशांत महासागरात ला नीना स्थिती सक्रीय असून मध्य व पूर्व भागात तापमान सामान्य तापमानाच्या खाली आहे. म्हणजेच कमजोर आहे. एप्रिलच्या शेवटी ला नीना सक्रीय होऊन तो पुन्हा तटस्थ होणार आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
येत्या पाच दिवसात कसे राहणार हवामान?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 1 ते 5 फेब्रुवारीपर्यंत उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानाचा पारा घसरणार असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात किमान तापमान 1-4 अंशांनी वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे. या महिन्यात बहुतांश ठिकाणी तापमान चढेच राहणार असून चार ते पाच दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे.
Discussion about this post