मुंबई । अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीत प्रचंड खळबळ माजली असून अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले असून मोठी फूट पडली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार आहे. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी एका विचार धारेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. यामुळे मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून आपण शरद पवार यांच्याकडे राजीनामा देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवार साहेबांसोबतच राहावं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, दुसरीकडे अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा या द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडकले आहेत. काय करावं हेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजत नाहीये. त्यातच आता अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षांना फोन करून सोबत राहण्यास सांगितलं आहे. तर जिल्हाअध्यक्षांनी पाठिंबा कुणाला द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी बैठका बोलावल्या आहेत.
Discussion about this post