मुंबई । नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले असून यांनतर आज मुंबईतील वरळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले.
राज ठाकरे यांनी कोहिनूर मिल खरेदीच्या मुद्यावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर राज ठाकरेंची ईडीने चौकशी केली होती. या चौकशीनंतर राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राज यांच्यावर ईडी कारवाईचा दबाब असल्याची चर्चा सुरू झाली होती.
ईडी प्रकरणावर राज ठाकरेंनी काय म्हटले?
राज ठाकरे यांनी म्हटले की, शिवाजी पार्कमध्ये लहानाचा मोठा झालो. त्यावेळी आमच्या परिसरात कोहिनूर मिल होती. मी व्यवसाय सुरू केला होता. आता व्यवसाय करणे हा काही गुन्हा नसल्याचे राज यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, एनटीएसच्या सगळ्या गिरण्यांची विक्री करून कामगारांची देणी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे होते. त्या वृत्तात कोहिनूर मिलचे नाव होते. त्यावेळी माझ्या व्यावसायिक भागीदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर आम्ही निविदा भरली. त्यात टेंडर लागलं असल्याचे भागिदाराने सांगितले. मग 400-500 कोटींची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आयएसएफ कंपनीसोबत भागिदारी केली आणि त्यांनी सगळे पैसे भरले. पुन्हा कोर्ट कचेरी सुरू झाली. त्यानंतर हा कोहिनूरचा प्रकल्प आमच्यासाठी पांढरा हत्ती ठरण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे इतर भागिदारांशी चर्चा करून आम्ही आमचा शेअर घेऊन त्यातून बाहेर पडलो. ही घटना 2005 च्या सुमारासची आहे.
ईडीची नोटीस आली…
एकेदिवशी ईडीची नोटीस आली. ही अचानक ईडीची नोटीस कशी काय आली ही भानगड समजली नाही. त्यानंतर चौकशीला मी सामोरे गेले. त्यावेळी ते अधिकारी काय विचारत आहेत हे देखील कळत नव्हते. आम्ही कोहिनूरच्या प्रकल्पातून बाहेर पडलो. त्या पैशांवर करही भरला. मग माझ्या सीएला बोलावले आणि त्याला हा प्रकार सांगितले. त्यावेळी त्याने सांगितले की, तुम्ही तो कर भरला तुमच्या भागिदाराने तो कर न भरता दुसरीकडे वळवला. त्यामुळे मग आम्ही पुन्हा कर भरला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ईडीची नोटीस आल्याने राज ठाकरे मोदींची स्तुती सुरू झाली असे काहीजण बोलू लागले. मी डोक्यावर टांगती तलवार घेऊन फिरणारा नाही असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
Discussion about this post