अंबरनाथमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून ज्यात चुकीच्या बाजूने ट्रेलर चालवत किमान ५० वाहनांना धडक दिली. यात पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश होता. दरम्यान या मद्यधुंद ट्रेलर चालकाला पोलिस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडलं.
या घटनेबाबत असे की, अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली- बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला. नेवाळी नाक्याकडून बदलापूरच्या दिशेनं निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर भरधाव वेगात चुकीच्या बाजूने जात या ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली. चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
ट्रेलर चालकाने वाटेत समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. यात कार, दुचाकी, रिक्षा, इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीचे देखील मोठं नुकसान झालं आहे. तर एका दुचाकी चालकाला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केली. शिवाजीनगर पोलिस आणि रिक्षाचालक पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच मद्यधुंद ट्रेलर चालकानं आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर घुसवला.
पोलिसांना पाहून थांबण्याऐवजी ट्रेलर चालकाने अतिवेगामुळे ट्रेलर चालवला. शेवटी हा ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या. या भीषण अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी काही जण जखमी झाले आहेत. तर किमान ५० वाहनांचे या अपघातामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे.
Discussion about this post