नाशिक । नाशिकमध्ये रिक्षा आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.यात एका चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना घोटी-सिन्नर महामार्गावर घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घोटी-सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ (SMBT Hospital) ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील तिघांची जागीच मृत्यू झाला. तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. रिक्षा चालक अमोल विनायक घुगे (रा. कल्याण), स्वरा अमोल घुगे (4), मार्तंड पिराजी आव्हाड (60), अशी मृतांची नावे आहेत.
कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी (Police) कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
Discussion about this post