मुंबई । डिसेंबर महिन्यात कडाका वाढवणारी थंडी जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसांनंतर मात्र कुठेतरी दडी मारून बसताना दिसली. मागील काही दिवसांपासून पहाटेची थंडी वगळता सूर्य डोक्यावर आल्या क्षणापासून उष्मा अधिक तीव्र होत असल्याची वस्तुस्थिती राज्याच्या बहुतांश भागांमध्ये दिसून आली आहे.
जानेवारी महिन्याचे शेवटचे 10 दिवस उरलेले असतानाही ही थंडी काही पुन्हा जोर धरताना दिसत नाहीय. सध्या उत्तर महाराष्ट्रात तापमान १० अंशाच्या खाली घसरलेय. पण, हा गारठाही फार काळ टीकला नसून, येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात पुन्हा तापमान वाढीस सुरुवात होणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याने राज्याचा किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या वर सरकला आहे. किमान तापमानात वाढ झाली असतानाच उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा तसेच कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जळगाव जिल्ह्यातही मागील दोन दिवसापासून तापमानात घसरण दिसून आले. मात्र आगामी दिवसात तापमानात चढ उतार दिसून येईल. राज्यात फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष तापमानवाढीस सुरुवात होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
का निर्माण झालीय ही स्थित?
देशाच्या हिमालयीन पर्वतरांगांच्या क्षेत्रासह उत्तर भारतात पश्चिमी झंझावात सक्रीय आहे. परिणामस्वरुप दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणामध्ये थंडीचा कडाका टीकून आहे. असं असलं तरीही बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं उत्तरेकडील शीतलहरींचा राज्यावर फारसा परिणाम होताना दिसत नाहीय. त्यामुळं तापमानात वाढ नोंदवली जात आहे.
Discussion about this post