जळगाव/पुणे । उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमानात मोठी घसरण झाल्याने महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. जळगावसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 10 अंशांवर पोहोचलं. यामुळे हुडहुडी भरणारी थंडी जाणवत असून मात्र यातच राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टी क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली आहे. येथे पारा 5 अंशांवर पोहोचला आहे. तर सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरीमध्ये करण्यात आली असून, येथे तापमान 33 अंशांच्या घरात राहील असा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाने कोकणात 11 जानेवारीरोजी तर मध्य महाराष्ट्रात 12 आणि 13 तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यातही पावसाच्या सरी बरसणार आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत आहे. येथे थंडीचा जोरही वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे थंडीत वाढ झाली आहे. अशात पावसाचा देखील इशारा देण्यात आलाय. जळगावात ही पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून या दरम्यान तुरळक पावसाचा अंदाज आहे.
Discussion about this post