पुणे / जळगाव : राज्यात जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. त्यानंतर २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस सुरु झाला आहे. मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली तर अद्यापही काही ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, पुणे हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी काही ठिकाणी यलो अन् काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ३ अन् ४ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात जुलै महिन्यात सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पेरण्या खोलंबल्या आहेत. पुढील दोन ते तीन दिवस शहरात ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे
Discussion about this post