जळगाव । देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून मंत्र्यांचे खातेवाटपही झाले. परंतु अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीय. याच दरम्यान राज्याचे नवे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी हा तिढा दोन दिवसांमध्ये सुटेल असे म्हटले आहे.
मंत्रिमंडळामध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी नुकतेच आपल्या खात्याचा पदभार स्विकारला. पाणी पुरवठा खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी कामाची पाहणी केली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी “पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये भेटी देण्याचा माझा मानस आहे. तसेच राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांची देखील मी माहिती घेणार आहे. सर्व प्रकल्प पुढील सहा महिन्यात कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न राहील. काही ठिकाणी ठेकेदारांमुळे प्रकल्प रखडलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल” असे म्हटले.
दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांना पालकमंत्रीपदाच्या विस्ताराविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना गुलाबरावांनी ‘तीन पक्षांचे मिळून सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित मिळून जो निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. मला वाटतं पुढील दोन दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल’ असे विधान केले.
याशिवाय गुलाबराव पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही भाष्य केले. “पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहे. आता सर्वांनी या प्रकरणात संयम धरला पाहिजे आणि आरोपींना कडक शिक्षा कशी होईल?, याकडे लक्ष दिले पाहिजे”, असे गुलाबराव यांनी म्हटले.
Discussion about this post