पुणे । बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असणाऱ्या वाल्मीक कराड अखेर आज पोलिसांच्या शरण आला. पुण्यातील सीआयडीच्या समोर वाल्मीक कराडने सरेंडर केलं. एका एसयुव्हीमधून वाल्मिक कराड याने सीआयडी मुख्यालयात हजेरी लावली. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही कार्यकर्ते होते. वाल्मिक कराड हा मागील काही दिवसांपासून पुण्यातच असल्याची माहिती त्याच्या कार्यकर्त्याने दिली.
सोमवारी, वाल्मिक कराड हा अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला असल्याची माहिती या कार्यकर्त्याने दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती. मात्र, वाल्मिक कराड यांनी तब्बल 23 दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला.
वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात कोणताही गुन्हा नाही. त्यांच्याविरोधात केवळ पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराड याची चौकशी नेमकी कोणत्याप्रकारे करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला जाणार का, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Discussion about this post