मुंबई । माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाबाबत सूचक विधान केले. “मी साईबाबांचा भक्त आहे. ते माझं मंत्रिपद ठरवत असतात. मी मंंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन. माझे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत” असे केसरकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर यांना संधी मिळाली नाहीय. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरूय. अशात ‘मंत्रिपद न दिल्याने मी नाराज नाही’, असे म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाबाबत सूचक विधान केले. त्यांनी “मला मंत्रिपद मिळू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी साईबाबांचा भक्त आहे. मी मंत्रिपदापेक्षाही मोठ्या पदावर जाईन. माझे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. माझी तेथे चांगली ओळख आहे”, असे म्हटले आहे.
गणवेश योजनेवरुन आदित्य ठाकरेंनी केसरकरांवर आरोप केला होता. माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावरही भाष्य केले. “आदित्य ठाकरेंचं वय आहे, तितकीही त्यांना अक्कल नाही. ते अजून लहान आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून यांना करोडो रुपये मिळतात, त्याला हे लोक खोके म्हणतात. थोडे पैसे मिळाले की त्याला ते मलाई बोलण्याची त्यांना सवय आहे. त्यांच्यामुळेच शिवसेनेचे दोन तुकडे झाले”, असे विधान दीपक केसरकरांनी केले आहे. “मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो. या काळात एकही कंत्राटदार, बिल्डरने मला एक रुपया जरी दिला असं म्हटलं तर मी राजकारण सोडेन. आदित्य ठाकरेंसारख्या लहान मुलाकडून ऐकून घ्यायला मी आलेलो नाही. हम आग पे चलते है, चलते रहेंगे! ये लोग पॅलेस पॉलिटीक्स करते है, करते रहैंगे!” या शब्दांमध्ये केसरकरांनी भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंवर निशाणा साधला.
Discussion about this post