धुळे | धुळे शहरात एक गंभीर घटना समोर आली आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एटीएसच्या पथकाने न्यू शेरे पंजाब लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी धुळे शहरात ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने बांगलादेशी नागरिक आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची टीम न्यू शेरे पंजाब लॉज येथे दाखल झाली आणि रूम नं.122 मध्ये वैध कागदपत्राशिवाय राहत असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.
अटकेत आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये महंमद मेहताब बिलाल शेख (48), शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (43), ब्युटी बेगम पोलस शेख (45) आणि रिपा रफीक शेख (30) यांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक महिदीपुर, बांगलादेश येथील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की महंमद शेख आणि शिल्पी बेगम हे पती-पत्नी असून, ब्युटी बेगम आणि रिपा रफीक शेख ह्या त्यांच्या बहिणी आहेत. बेरोजगारीला कंटाळून हे नागरिक कोणतेही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला आहे. धुळे शहरात कामधंदा आणि घराच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळून आले नाहीत. ते नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आयएमओ हे अॅप वापरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post