जळगाव | जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना दणका देत दोघांना एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे.
यातील प्रकाश चंद्रकांत कंजर ( वय ३४, रा. खंडेराव नगर, जळगाव) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.यासोबत, सोनू रामेश्वर पांडे (वय २४ रा. मामाजी टॉजीक मागे, भुसावळ ) याच्यावर आर्म ऍक्टसह एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पुणे येथील कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.
गेल्या नोव्हेंबर पासून ते आजवर जिल्ह्यातील २१ विविध गुन्हेगरांना स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती ( व्हिडीओ पायरेट ); वाळू तस्कर व काळा बाजार करणार्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम सन १९८१ ( महाराष्ट्राचा कायदा क्रमांक ५५ सन १९८१ ) सुधारणा अधिनियम २०१५ अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post