मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीसरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून केंद्रातील महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू देऊन शिंदे गटाला दोन मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या दोन मंत्र्यांचा शिंदे गटासाठी बळी जाणार याचीच चर्चा आता रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अचानक दिल्लीत गेले. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते मध्यरात्री उशिरा मुंबईत आले.
दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अद्यापही राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीय. अशातच कालची शाह यांच्यासोबतची शिंदे आणि फडणवीस यांची चर्चा फायनल चर्चा होती असं सांगितलं जातं. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत.
शाह यांच्या बैठकीत शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदिल देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे सरकारमधील कामचुकार आणि वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. तशा स्पष्ट सूचनाच याआधी शाह यांनी शिंदे यांना दिल्या होत्या. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या विस्तारात मित्र पक्षांनाही स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रातील दोन मंत्र्यांना घरी पाठवणार
दरम्यान, शिंदे गटाला केंद्रात स्थान देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या दोघांचा समावेश केला जाणार आहे. त्या बदल्यात महाराष्ट्रातीलच दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मात्र, शिंदे गटासाठी बळी जाणारे हे दोन मंत्री कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर केंद्रात शिंदे गटाकडून कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे ही गुलदस्त्यात आहे.
Discussion about this post