एरंडोल : जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर वृक्ष पडल्यामुळे एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना एरंडोल-कासोदा रोडवरील अंजनी धरणाजवळ घडली. तर जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे.
एरंडोल शहरापासून काही अंतरावरील अंजनी धरणाजवळ हा भीषण अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताने पोलीस दलात शोककळा पसरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
पिलखोड जिल्हा बँक शाखेत वनविभागाच्या अधिकार्यांनी तत्कालीन व्यवस्थापकाच्या सहभागाने सुमारे दिड कोटींचा अपहार करीत वनविभागाची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास जळगाव गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी गुरुवारी सकाळीच पिलखोड (ता.चाळीसगाव) येथे शासकीय वाहनाने (एम.एच.19 एम.0751) रवाना झाले होते.
दिवसभर केलेल्या चौकशीनंतर तपास पथक जळगावकडे येत असताना एरंडोल शहराजवळील अंजनी धरणानजीक रात्री जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली व त्याचवेळी जीपच्या पुढील भागावर झाड कोसळताच चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत सीताराम शिंदे, भरत नारायण जेठवे व निलेश प्रकाश सूर्यवंशी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
जखमींना एरंडोल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, यांनी धाव घेत माहिती जाणली. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
Discussion about this post