जळगाव । जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. दरम्यान, शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारातून एका डॉक्टर व्यवसायिकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, जळगाव शहरातील महाबळ परिसरात डॉक्टर हरी राजन अय्यंगार वय 51 हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून वैद्यकीय व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २७ जून रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान ते जळगाव जिल्हा न्यायालयात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ बीएस ५९८८)ही न्यायालयाच्या पार्किंगमध्ये पार्क करून लावलेली होती.
दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून दिली. डॉक्टर हरी अय्यंगार यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना त्यांची दुचाकी मिळाली नाही. अखेर बुधवारी २८ जून रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.
Discussion about this post