जळगाव । जळगावसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने हुडहुडी भरणारी थंडी जाणवत असून कपाटातून गरम कपडे काढले जात आहे. पुढील दहा दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी वाढू शकते.
फेंगल चक्रीवादळामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. त्यामुळे शहरातील किमान तापमान हे १८ अंशांवर पोहोचले होते; परंतु आता पुन्हा उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली आहे. जळगावमध्ये सोमवारी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे हुडहुडी भरवणारी थंडी वाढत आहे. ग्रामीण भागात थंडीचा कडाका अधिक प्रमाणात आहे.
सकाळी ६ ते ८ या दरम्यान प्रचंड थंडी जाणवत असून, सोमवारी किमान तापमान ८.६ अंश तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. येत्या १५ तारेखपर्यंत किमान तापमान हे ८ ते ९ अंश दरम्यान असणार आहे. या काळात चांगलीच हुडहुडी जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान अभ्यासकांनी केले आहे. दरम्यान, किमान तापमान ४ डिसेंबरला १८.८ अंशांवर होते. सहा दिवसांत ते १० अंशांनी खाली आले आहे.
Discussion about this post