राज्यामध्ये सध्या हवामानामध्ये मोठा बदल झाला आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत असून हिवाळ्यामध्ये नागरिक थंडीचा अनुभव घेण्याऐवजी पावसाचा अनुभव घेत आहेत. गेल्या काही दिवस नागरिकांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला पण आता राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. बुधवारी काही ठिकाणी पाऊस पडला.
हवामान खात्याने गुरूवारी देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने राज्यातील १० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.
राज्यामध्ये तामानात सतत बदल पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ आणि दमट वातावरण आहे. त्यामुळे थंडी ऐवजी गरमीच वाढली आहे. थंडी गायब झाल्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. अशामध्ये काही ठिकाणी पाऊस देखील पडत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढला असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगील, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Discussion about this post