नाशिक । मागील काही काळापासून पेपर फुटीचे प्रकार समोर आले आहे. अशातच आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS च्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेपर सुरू होण्याच्या काही वेळ आधी एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्मकोलॉजी -1 या विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी थेट सोशल मीडियावर लिक झाल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला फेर परीक्षेची नामुष्की ओढवली आहे.
विद्यापीठाला माहिती मिळताच पेपर तत्काळ रद्द करून या विषयाची फेरपरीक्षा १९ डिसेंबरला ठेवली आहे. परीक्षेसाठी राज्यात १०० केंद्रांवर ५ हजार ९०० विद्यार्थी प्रविष्ठ होते. दरम्यान, चौकशीसाठी विद्यापीठस्तरीय समिती नेमल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. याशिवाय सायबर सेलच्या मदतीने ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. कुलगुरूंनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ऐन परीक्षेच्या दिवशी तासभर आधी MBBS परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यापीठाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत अधिक कडक उपाययोजना केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Discussion about this post