जळगाव । बंगलाच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल झाला आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील काही ठिकाणी थंडी गायब झाली असून किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडीचा कडाका थंडीची लाट पसरली आहे. राज्यात या आठवडाभर कसं हवामान राहिल हे आपण पाहणार आहोत…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रुपांतर फेंगल चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे चक्रीवादळ शनिवारी रात्री उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले. ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहिल आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मंगळवार आणि बुधवारी म्हणजेच ३ आणि ४ डिसेंबरला नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड आणि कोरड्या उत्तरी वाऱ्यांना बंगालच्या उपसागरातून ‘फेंगल’ चक्रीवादळाच्या बाह्यपरिघ फेरीतून एकदम काटकोनातून म्हणजे पूर्वे दिशेकडून, १६ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यान लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कार्तिक आमावस्या ते चंपाषष्टी म्हणजे १ डिसेंबर ते शनिवार ७ डिसेंबरपर्यंतच्या आठवड्यात पहाटेच्या किमान आणि दुपारच्या कमाल अशा दोन्हीही तापमानात किंचितशी वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात आठवडाभर काहींशी थंडी कमी होतांना जाणवणार आहे. सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८ तर पहाटेचे किमान तापमान १२ ते १४ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असून ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरी इतकी अजूनही जाणवतात. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि उत्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये थंडी कायम राहणार आहे.
Discussion about this post