मुंबई । महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे संपले आहे. सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाकडून नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीच्या तिकीटदरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० रुपायांमागे १५ रुपये तिकीट वाढण्याची शक्यता आहे.
मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही, असे सांगत एसटी महामंडळाकडून दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. एसटी महामंडळाने १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटीच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
एसटी महामंडळाचा १४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारने स्वीकारल्यास १०० रुपयांच्या तिकीटामागे १५ रुपये अधिक मोजावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. याआधी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीटदरवाढ झाली होती. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी दरवाढीचा निर्णय घेणार का? याकडे लक्ष लागलेय.
Discussion about this post