मुंबई । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. यावेळी सात प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक झाली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. मतदानानंतर आता निकालाकडे राजकीय पक्षांसह अख्या महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोल्सचे निष्कर्ष समोर आले. अगदी कालही काही एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले. बहुतांश एक्झिट पोल्सनी पुन्हा महायुती सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. निकालाच चित्र काय आहे? ते उद्या स्पष्ट होईल. निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदत लागेल असा अंदाज आहे. तीच शक्यता लक्षात घेऊन महायुतीने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवली आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत महायुती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत दिसणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आपल्या विश्वासू नेत्यांवर सोपवल्याची माहीती आहे.
भाजप नेते सक्रीय
दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रीय झाल्याची माहीती आहे. देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमवीची जबाबदारी देण्यात आली आहे.
Discussion about this post