जळगाव : हिवाळा सुरु होऊन महिना उलटला. तरी अद्याप हुडहुडी भरणारी थंडी नागरिकांना जाणवत नाहीय. मात्र आता महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. सोमवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी १३.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे थंडी वाढली तर त्यामुळे रब्बी पिकांना फायदा होणार आहे.
रात्रीच्या तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातदेखील घट होत असून, तीन दिवसांपूर्वी ३५ अंशावर असलेले जळगावचे तापमान सोमवारी ३२ अंशापर्यंत खाली घसरले होते. दरम्यान, आगामी आठवडाभरात तापमानात अजून घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून हिमालयीन भागामध्ये बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय होणार आहेत. त्यातच बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रवाती हवांचे कोणतेही क्षेत्र सध्या नसल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तापमानात अजून घट होणार आहे.
Discussion about this post