पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या पूर्व प्रजासत्ताक दिन पथ संचलन शिबिरास विद्यापीठात प्रारंभ
सात राज्यातील विद्यार्थी शिबिरात सहभागी
जळगाव I तेलंगाणा राज्यातील फुलांचा उत्सव, आंध्र प्रदेशचे लोकनृत्य, गोवाचे वारकरी नृत्य, महाराष्ट्राचे लेझीम व महाराष्ट्रीय वेशभूषा सादर करीत भारतीय एकात्मतेचे दर्शन दाखविणाऱ्या शोभा यात्रेमुळे विद्यापीठाचा परिसर मंगळवारी सायंकाळी भारावून गेला.

निमित्त होते दि.१२ नोव्हेंबर पासून विद्यापीठ परीसरात सुरु झालेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिराचे. १० दिवसाच्या या शिबीराला उदघाटनाआधी शोभायात्रेने प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून सायंकाळी ४.३० वाजता कुलगुरु प्रा.व्ही. एल. माहेश्वरी यांनी या शोभायात्रेला हिरवी झेंडी दिली.

भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आणि रासेयोचे विभागीय संचालनालय पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर सुरु झाले आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगना, गुजरात, दमन, दादरा-नगरहवेली, गोवा या सात राज्यातील २०० रासेयो स्वंयसेवक शिबिरात सहभागी झाले आहेत.

शेाभायात्रेत रासेयो स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले होते. आपल्या प्रदेशातील संस्कृती आणि अस्मिता दर्शविणारी वेशभूषा, घोषणा यामुळे परिसर दणाणून गेला होता. तेलंगाणाच्या विद्यार्थिनींनी बदकम्मा व बोनालू हे नृत्य तर विद्यार्थ्यांनी डप्पू बँड सादर केला. आंध्रच्या रासेयो स्वयंसेवकांनी पंचकट्टू लोकनृत्य सादर केले. गोवाचे विद्यार्थी वारकरी होऊन नृत्य सादर करतांना दिसले. महाराष्ट्राच्या संघाने लेझीम सादर केले. प्रशासकीय इमारतीजवळ शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा.म.सु.पगारे, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. पवित्रा पाटील, सीए रवींद्र पाटील, रासेयो प्रादेशिक संचालक अजय शिंदे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, युथ ऑफीसर सुमंतकुमार यादव, सिनेट सदस्य नेहा जोशी, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्यासह प्रा.संजय शिंगाणे, प्रा. किरण कुलकर्णी, डॉ.दिनेश पाटील, प्रा.योगेश पुरी, प्रा.मनीष करंजे, प्रा.पांडुरंग पाटील, प्रा.मनोहर पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते.















Discussion about this post