मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखवाला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवान विस्कळीत झालेले पाहायला मिळेल. मात्र उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाहीय. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसांसाठी महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
हवामान विभागाने 27 आणि 28 जूनसाठी महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकण, मध्यम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील भागाचा देखील समावेश आहे. हाच अलर्ट पुढे 29 आणि 30 जूनसाठी देखील असण्याची शक्यता आहे. पण या दरम्यान वातावरणात काही बदल झाल्यास पाऊस काही काळासाठी थांबूदेखील शकण्याचा किंवा कमी होण्याचा अंदाज आहे.
पुढच्या 48 तासांमध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर शहारामध्ये पावसाने सध्या चांगलाच जोर धरला आहे. हा जोर पुढच्या 48 तासांसाठी कायम असण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगलाच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोकणासह विदर्भातही पाऊस चांगली बॅटिंग करण्याचा अंदाज आहे.
Discussion about this post